माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

24.9.08

कामाचा ताण

सकाळी उठल्यापासून धावायला जी सुरूवात होते ती कधी संपतच नाही. डोळे उघडायच्या आतच कामं समोर येऊन उभी राहतात. कुठलाचं आनंद चवीने घेता येत नाही. संध्याकाळी फ़िरायला जाणं, गाणी ऎकणं, आवडीचं पुस्तक वाचणं, हे सगळं सोडाच परंतु जीव बिचारा कायम दमलेला, शिणलेला, कावलेला, कंटाळलेला...

का येतो हा कामाचा ताण? त्यामुळे आपली ऊर्जा का संपते?

  1. सतत फ़क्त कामाचाच विचार करणे
  2. एकाच प्रकारचं काम खूफ वेळ करत राहणे
  3. कामाच्या वेळा निश्चित नसणं
  4. स्वत:च्या छंदासाठी वेळ न मिळणं
  5. कामाचं सतत टेंशन असणं
  6. कामाच्या डेडलाईन्स खूप टाईट असणं

कामाच्या ताणाची लक्षणं

  1. कामात लक्ष लागत नाही. कॉन्सन्ट्रेशन होत नाही
  2. सतत थकवा जाणवतो
  3. कशातच काही अर्थ उरला नाही असं वाटणे
  4. कामाचं भयंकर टेंशन येतं
  5. निराश वाटायला लागतं
  6. चिडचिड होते
  7. झोप लागत नाही

यावरील काही उपाय -

  1. कामातून मधून मधून ब्रेक घ्या. सलग दोन दिवसांची का होईना पण सुटी घ्या
  2. स्वत:ला काय आवडतं त्या गोष्टी करण्यासाठी वेळ द्या
  3. रोज थोडा तरी व्यायाम करा
  4. आपल्याला न आवडणारं एखादं काम करावं लागत असेल तर ते बदलून घ्या
  5. कामाची टेंशन्स ऑफ़िसमध्येच ठेवायचा प्रयत्न करा
  6. घरच्यांबरोबर थोडा तरी वेळ काढा
  7. मग बघा तुमच्यावरील कामाचा ताण तुम्हाला कसा घाबरतो ते!

23.9.08

रोगांपासून रक्षण कसे करावे?

काही खाद्यपदार्थ व पेय शरीरास आवश्यक असतात. परंतु ते इतर खाद्यपदार्थांबरोबर मिसळल्यास विषासारखे काम करता हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

हितकारी संयोग -
  • खरबुजासोबत साखर खावी
  • आंब्यासोबत गाईचे दुध घ्यावे
  • केळीसोबत विलायची खावी
  • खजुरसोबत दुध घ्यावे
  • भातासोबत दही खावे
  • चिंचेसोबत गूळ खावा
  • पेरुसोबत सोप खावी
  • टरबुजासोबत गूळ खावा
  • मक्यासोबत ताक घ्यावे
  • मुळ्यासोबत मुळ्याची पाने खावी
  • दह्याचा रायता खावा
  • गाजर आणि मेथीची भाजी खावी
  • जुन्या तुपासोबत लिंबाचा रस घ्यावा
  • पुरी किंवा कचोरीसोबत गरम पाणी प्यावे
  • शेंगदाण्यांसोबत गाईचे दुध, मठ्ठा प्यावा

अहितकारी संयोग -

  • दुधासोबत दही, मीठ, चिंच, आंबट फ़ळ खाऊ नये
  • दह्यासोबत खीर, दुध, पनीर खाऊ नये
  • खिरीसोबत खिचडी, आंबट पदार्थ, सत्तु खाऊ नये
  • मधासोबत मुळा, गरम पदार्थ किंवा पाणी पिऊ नये
  • तुपासोबत समप्रमाणात मध खाऊ नये
  • चहासोबत काकडी, खिरा खाऊ नये
  • भातासोबत व्हिनेगार घेऊ नये

अजीर्ण झाल्यास उपाय -

अधिक खाल्ल्याने त्रास झाल्यास खालील उपाय करावेत

  • केळी आणि एक किंवा दोन छोटी विलायची
  • जांभूळ आणि दोन आंबे किंवा मीठ
  • पेरू आणि सोप
  • लिंबु आणि मीठ
  • उडदा़ची डाळ आणि गूळ
  • चिंच गुळ
  • वांगी सरसोचं तेल

20.9.08

स्ट्रेस डायरी

दैनंदिन जीवनातील तणाव ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या आहे. तणावाचे परिणाम काय काय होतात हे सांगणेही कठीण आहे. शरीर व मन व्याधिग्रस्त करणारा हा तणाव कोणाला कोणत्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही. अगदी स्वत:ला न समजताही आपण तणावात राहत असतो. आपण तणावात आहोत किंवा नाही, कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला तणाव येतो हे जाणून घेण्यासाठी स्ट्रेस डायरी ठेवणे हा एक उपाय आहे. स्ट्रेस डायरी म्हणजेच दैनंदिन घटनांची तपशीलवार नोंद करणे. कोणत्या घटनांमुळे आपल्याला तणाव आला, हे जाणून घेणे या डायरीमुळे शक्य होते. दररोज घडलेल्या महत्वाच्या प्रसंगांची डायरीत नोंद करा आणि आठवड्यातुन एकदा आढावा घ्या.

  • कोणत्या घटनेमुळे आपल्याला सर्वाधिक ताण आला आणि का?
  • तणाव होणारे घटक अंतर्गत की बाह्य?
  • तणाव येऊ नये याकरता काय करता?
  • त्यामुळे ताण कमी होईल असे वाटते का?

हे प्रश्न स्वत:ला विचारून तणवमुक्तीचा मार्ग स्वत: विकसित करा.

16.9.08

कुलाचार - कुलदैवत

हिंदु धर्म संस्कृतीत चार गोष्टी अतिशय महत्वाच्या मानल्या जातात. त्या म्हणजे कुलदेवता, कुलदैवत, इष्टदैवत आणि पितरांची सेवा.

१. कुलदेवता - कुलदोवता म्हणजे देवी. जिला आपण कुलदेवी म्हणतो. आपल्या वंशजांनी नित्य पूजेत जिला स्थान दिले जिच्यामुळे आपल्या कुळाचा, घराण्याचा उध्दार झाला अशा देवीला आपल्या वंशजांनी कुलदेवता मानले. म्हणून तेव्हापासून आपण लग्नात त्यांचा सन्मान करून पूजा करू लागलो. रोज तिची सेवा करतो.

संपूर्ण भारतातील देवीची मुख्य स्थाने -

१. काश्मिरची वैष्णवी

२. कोलकात्याची महाकाली

३. कन्याकुमारीची महासरस्वती

आपल्या महाराष्ट्रातील देवीची प्रमुख पीठे -

१. तुळजापूरची अंबा भवानी

२. माहुरची रेणुका देवी

३. कोल्हापुरची महालक्ष्मी



२. कुलदैवत - आपल्या वंशजांनी कुलदेवतेप्रमाणेच कुलदैवत मानले. कुलदैवत म्हणजे कुळाचा उध्दार करणारा देव. तो म्हणजे खंडोबा, जोतिबा, भैरवनाथ, महादेव, नृसिंह, अर्धनारी नटेश्वर इ. असून त्यांची सेवा घरातील कर्त्या पुरूषाने करावी.



३. इष्टदेवता - आपापल्या आवडीप्रमाणे उपासनेकरीता निवडलेला देव उदा. गणपती, विष्णु, दत्तप्रभू, श्रीकृष्ण, श्री स्वामी समर्थ वगैरे यांचे मंत्र, स्तोत्र जप करावेत.



४. पितरांची सेवा - मासिक श्राध्द, वर्ष श्राध्द, संक्रांत, अक्षयतृतीया, सर्वपित्री अमावास्या, धूलिवंदन, चैत्र प्रतिपदा, त्रिपिंडी इ. या गोष्टी हिंदु धर्मात फ़ार महत्वाच्या मानल्या जातात. या गोष्टी जरूर केल्या पाहिजेत. म्हणजे वैयक्तिक त्रास, घराला आलेली अवकळा दूर होऊन सुख, शांती मिळेल.

13.9.08

मुलाखतीला जाताना

मुलाखतीचे निमंत्रण हे तुमच्या भावी यशाची नांदी असते. विशिष्ट नोकरीसाठी लागणारी किमान पात्रता तुमच्याजवळ आहे याची ती पावती असते. तुम्हाला मुलाखतीला बोलावून तुमचा भावी मालक तुम्ही अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे काही गोष्टींचा सोक्षमोक्ष करून घेत असतो.

सामान्यत: मुलाखतीचे पत्र कमीत कमी एक आठवडा अगोदर येते. आपणास तयारीस पुरेसा वेळ मिळतो. ग्रामीण भागात पत्रे वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे मग ऎनवेळी पत्र मिळाले तरी ’कपडे चांगले नाहीत’ असे म्हणून चालत नाही. तर आपण जे कपडे नेहमी वापरतो तेच वापरावेत. परंतु ते नीट्नेट्के, स्वच्छ व धुतलेले असावेत. शक्यतो त्याला इस्तरी केलेली असावी. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात निश्चित फ़रक पडतो. अगदीच भडक, फ़ॅशनेबल कपडे घालू नयेत. आपण कोणत्या पदासाठी मुलाखतीस जात आहोत याचेही भान असायला हवे. भारी किंमतीचा पोशाख मुलाखतीसाठी प्रथमच वापरू नये. मुलींनी नवीकोरी साडीऎवजी नेहमीची पण स्वच्छ साडी किंवा पंजाबी ड्रेस घालावा.

शासकीय किंवा खाजगी नोकरीत काही अपेक्षित शैक्षणिक पात्रता गृहीत धरलेली असते. त्यामुळे त्यांची तोंडी मुलाखत घेण्यात येते जेणेकरून उमेदवाराची बोलण्याची, वागण्याची पध्दती, विषयाची माहिती, चालू घडामोडींचे ज्ञान, नवीन शिकण्याची आवड तपासण्यात येते. मुलाखतीत याला अनुसरून प्रश्न विचारण्यात येतात.

मुलाखतीसाठी प्रवेश करतांना प्रथम शुभचिंतन केले पाहिजे. मुलाखतीत सर्व प्रथम सोपे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न विचारुन तुमच्या मनातील ताण कमी व्हावा हाच उद्देश परिक्षकांचा असतो. आपल्या नैमित्तिक सवयी उदा. तोंडावर हात ठेऊन प्रश्नांची अस्पष्ट उत्तरे देणे, पाय हलविणे, मान डोलावणे, टेबलावर हात ठेवणे, या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.

प्रश्नांची उत्तरे देतांना भरभर बोलू नये. परिक्षक प्रश्न विचारत असतांना उतावळेपणाने त्याचे उत्तर देऊ नये. प्रश्नांची अचुक व खरी उत्तरे द्यावीत. कारण त्यावरूनच तुमच्या व्यक्तिमत्वाची ऒळख होते. बऱ्याच प्रसंगात उमेदवाराला त्याच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती विचारण्यात येते. अशा वेळी त्याने खरी माहिती सांगणे आवश्यक आहे. साधी देखील माहिती सांगता आली नाही तर उमेदवाराने चेहऱ्यावर नाराजीची किंवा चुकलेपणाची भावना न दाखवता नम्रपणे "माहिती नाही" असे सांगावे. विनाकारण डोक्याला हात लावून विचार करत बसू नये.

मुलाखतीत विचारात घेतल्या जाणाऱ्या गोष्टी -
१. व्यक्तिमत्व - तुमचा पोशाख, वागण्याची पध्दत, आवाज, बोलण्याची पध्दत व वेग, मनोधैर्य, आत्मविश्वास

२. कौटुंबिक पार्श्वभूमी - तुमचे वडील, काका, मामा इ. च्या नोकऱ्या व त्यातील स्थान, त्यांचे समाजातील वजन, संदर्भ असलेल्या व्यक्ती

३. शिक्षण - शाळा, कॉलेज, त्यातील गुण, टक्केवारी, शिक्षण घेत असतांना खेळ, नाटके व अन्य उपक्रमातील सहभाग, यश व जबाबदाऱ्या

४. शिक्षणोत्तर अभ्यास - नोकरी व अनुभव इ. बाबत माहिती

५. आवडिनिवडी - वाचन, संगीत, चित्रकला, प्रवास, नृत्य, समाजकार्य, लेखन इ.

६. सामान्यज्ञान - यात तुमच्या व्यक्तिमत्व गुणाची पारख केली जाते. त्यात नेतृत्व, निर्णय घेण्याची क्षमता, सेवाभाव, कल्पकता, शिस्तप्रेम, तत्परता, प्रामाणिकपणा इत्यादी गोष्टी समाविष्ट होतात.

11.9.08

"इको फ़्रेन्डली" गणपती





इको फ़्रेन्डली हा शब्द तुम्ही सर्वांनी ऎकला असेलच. पण काहींना त्याचा अर्थ माहित नसतो किंवा ती काय भानगड आहे हेही माहित नसते. या शब्दातील ’इको’ म्हणजे पर्यावरण तर ’फ़्रेन्डली’ म्हणजे स्नेही. इको फ़्रेन्डली म्हणजे पर्यावरण स्नेही. परंतु या शब्दाचा आणि गणपतीचा संबंध तरी काय असणार हा प्रश्न मनात आल्यावाचून राहणार नाही. हो, हो मी पण तेच सांगणार आहे. गणपतीबाप्पांचा आणि पर्यावरणाचा खूप मोठा संबंध आहे.

गणपतीच्या मूर्ती ह्या कशाच्या बनवलेल्या असतात माहित आहे, प्लॅस्टर ऑफ़ पॅरीसच्या तसेच अनेक रासायनिक रंगांनी त्या रंगवल्या जातात. आणि मग आपण काय करतो, त्या गणपतीला बसवतो आणि प्रथेप्रमाणे शेवटच्या म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी त्यांना नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करतो. त्याने काय होते? तर त्याने नदीचे पाणी प्रदुषित होऊन त्यात ते रासायनिक रंग मिसळले जाऊन पाणी पिण्यायोग्य राहणार नाही. मग गणपती बाप्पा अशाने आपल्यावर फ़ार प्रसन्न होतील नाही का? गणेश मंडळांमध्ये तर स्पर्धाच लागतात कोणाची मूर्ती सर्वात मोठी. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की, जेवढी मूर्ती मोठी तेवढे प्रदुषण जास्त. विसर्जनाच्या दिवशीही मोठी मूर्ती पाण्यात व्यवस्थित बुडवली गेली नाही की तिची विटंबणा होईल. मग हे सगळे करून फ़ायदाच काय?



परंतु आता यावर करणार तरी काय? आपल्या प्रथा, आपले उत्सव आपण साजरे करणार नाही तर कोण करेल? अहो किती हे प्रश्न? आपणच साजरे करूया पण जरा वेगळ्या पध्दतीने. वेगळी पध्दत म्हणजे इको फ़्रेन्डली म्हणजेच ’गणपतीबाप्पा मोरया’ म्हणत त्याला पर्यावरणाच्या जास्त जवळ नेऊन. पण त्यासाठी करायच ते काय? तर त्यासाठी गणपती मंडळांनी मोठ्या मूर्तींचा अट्टाहास न धरता जास्तीत जास्त श्रध्दा ठेवून लहान मूर्ती बसवाव्यात. तसेच सजावटीसाठीही जास्त प्लॅस्टीकचा व थर्माकॉलचा वापर न करता पाने, फ़ुले यासारख्या नैसर्गिक संपत्तीचा वापर करावा. जेणेकरून ते रोज बदलवता येऊन त्यांचा खतासाठीही चांगला उपयोग करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी लहानशा तलावात त्या मूर्तींचे विसर्जन करता येऊ शकते.
तसेच घरात गणपती बसवतांना शाडूच्या मातीची घरच्या घरी बनवलेली मूर्ती बसवावी आणि शेवट्च्या दिवशी घराजवळच्या बागेत किंवा लहानशा बादलीत तिचे विसर्जन करावे. त्याचप्रमाणे शांततेत आणि गोंगाट न करता गणेशोत्सव जर साजरा करण्यात आला तर खऱ्या अर्थाने आपण पर्यावरण स्नेही हॊऊ. कारण गणपतीला फ़क्त गोंगाटच नको तर हवी फ़क्त मनापासून आणि श्रध्देने त्याची सेवा करण्याची तयारी. मग बघा गणपती बाप्पाही हे सगळे बघून फ़ारच खूश होतील.

10.9.08

सायबर गुन्हेगारी

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी इंटरनेटचा वापर करणाऱ्यांनी पुढीलप्रमाणे जागरूकता बाळगायला हवी.

१. चैटरूममध्ये स्वत:विषयीची माहिती देणे टाळा.

२. आपल्या पालकांच्या परवानगीशिवाय मुलांनी आपली छायाचित्रे ऑनलाईन पाठवू नयेत.

३. अत्याधुनिक ऐन्टी व्हायरस सॉफ़्टवेयरचा वापर करावा.

४. ज्या सुरक्षित साईटस आहेत त्यांनाच क्रेडीट कार्ड्ची माहिती पुरवावी.

५. सिक्युरिटी प्रोगामचा वापर करा.

६. तुमची स्वत:ची बेवसाईट असेल तर तुमच्या सर्व्हरवर कुणाचाही हस्तक्षेप रोखण्याची यंत्रणा बसवा.

७. तुमच्या डाटाबेसचे रक्षण करा.

9.9.08

एवढी धावपळ कशासाठी?

पुण्याला एका सॉफ़्टवेयर इंजिनीयर असलेल्या तरूणाने आत्महत्या केली. वाचली ही बातमी आपण? काय वाटले वाचून? त्या मुलाला का करावीशी वाटली आत्महत्या? त्याने त्याच्या घरच्यांच्या विचार केला नसेल का? हे अनेक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही मंडळी. पण त्याचे एक कारण हेही असू शकेल ते म्हणजे आजची बदलती परिस्थिती, जास्त पैशांचा हव्यास.



आजचे युग हे जीवघेण्या स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जो तो ऊर फ़ुटेस्तोवर काम करतो आणि करतच राहतो. कारण स्पर्धा ही काही थांबत नाही. पण ही स्पर्धा आपण कशासाठी करत असतो हे ठाऊक आहे का आपल्याला? ती करून जर आपल्याला मानसिक समाधान व मनाची शांती मिळत नसेल तर तिचा उपयोग तो काय? चांगले उच्च शिक्षण घेऊन नोकरी करायची आणि नोकरी टिकवता येत नाही म्हणून आत्महत्या करायची या गोष्टीला काही अर्थच नाही. कारण आपले जीवन हेच फ़ार अनमोल आहे. देवाने दिलेल्या या सुंदर देणगीला अव्हेरणे हा मोठा अपराध आहे. जीवनासारखं सुंदर काहीच नाही आणि जीवन नाही तर काहीच नाही हेसुध्दा आपल्या लक्षात येत नाही.



नोकरी करतांनाही जी गोष्ट आपल्याला येत नाही तिच्यासाठी स्पष्ट शब्दात "नाही" म्हणायला शिकले पाहिजे. उगाच जी गोष्ट येत नाही तिच्यामागे धावायच ते कशासाठी? तसचं एक प्रमोशन कमी मिळाले तर काही आभाळ फ़ाटणार नाही. दुसरे जातात तर जाऊ द्यायचं त्यांना. आपल्या क्षमता आपण ऒळखून कामाला लागायला हवं. मग बघा यश हे तुमचच आहे. आपल्याला जी काही गोष्ट करावीशी वाटत असेल ती आजच आणि आताच करा. तुम्हाला एखाद्याला आपल्या मनातील काही सांगायच आहे, मग ते आताच सांगा. उद्या सांगू, परवा सांगू करता करता तो दिवस येणारच नाही. काही खावसं वाटत मग ते आताच खा. आपल्याकडे भरपुर पैसे आले की मगच जीवन जगू ही गोष्ट मुर्खपणाची आहे. तसेच नुसतेच पैसे कमवून करायच काय आहे तुम्हाला? खुप पैसा कमवून जर मनाची संतुष्टी गमावून बसलात तर कायमचीच गमावून बसाल.



सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही हा पैसा कमावणार आहात ती तुमची जिवलग नातीच जर तुमच्याजवळ नसेल तर त्या पैशाला काहीही अर्थ राहणार नाही. मग तुम्ही फ़क्त आणि फ़क्त पळतच राहणार आणि जीवनाच्या शेवटी मात्र तुमच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही.

सांगण्याचे तात्पर्य हेच की, तुम्ही फ़क्त पैशाच्याच मागे धाऊ नका. तर मनाला आवडेल अशा खूप काही गोष्टी कराव्याशा वाटल्या तर नक्की करा.

याबाबतीत एक गोष्ट इथे सांगावीशी वाटतात, एक कुंभार असतो. तो मस्त आराम करत बसलेला असतो . त्याच्याजवळ एक शहरातील माणूस येतो. तो त्याला म्हणतो, अरे असा झोपत राहशील तर तुझे कामच राहून जाईल की!
कुंभार : मग त्याने काय होईल?
माणूस : तुला भरपुर पैसे मिळतील. तु चांगलं घर, गाडी घेऊ शकशील आणि मग बघं तुला किती छान झोपं लागते ते!
कुंभार : मग मी आता काय करत आहे?

ही गोष्ट सांगण्यामागे एकच हेतु, तो म्हणजे आपली कामे करत असतांना आपले ध्येय मात्र विसरू नये आणि त्या ध्येयाला गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. नाहीतर आपलीही गत गोष्टीतल्या कुंभारासारखीच होईल.

8.9.08

नेटगुनिया


दचकलात, नाही ना? कारण मागे एकदा चिकुनगुनियाची साथ आली होती. तसला हा प्रकार नाहीये. हा एक वेगळा आणि आजच्या तरूण पिढीच्या जवळ असणारा प्रकार आहे. नेटगुनिया म्हणजे इंटरनेटवर जास्तीत जास्त वेळ घालविणे. आपण इंटरनेटवर काही कामानिमित्त वेळ घालवितो पण जर हा वेळ कामाव्यतिरिक्त असेल तर सावधान, आपल्याला ’नेटगुनिया’ झालेला आहे, असे आपण म्हणू शकतो. तुम्हाला माहितच आहे, आपण नेटवर कशासाठी बसतो ते, उत्तर येईल आपल्याला काही काम असते म्हणून. मग आपल्याला काम ते कोणते असते? (मला पोस्ट टाकायच्या असतात, म्हणून मी नेटवर बसते) सर्वांचे उत्तर वेगळे येईल, नाही का? आपण जर एक दिवस इंटरनेटवर बसलो नाही तर आपल्याला कसेतरीच होते का, दररोज ई-मेल चेक करण्याशिवाय चैन पडत नाही, आपण आपला इनबॉक्स सतत चेक करत असतो, ई-मेल पाठवणे जरूरीचेच असते, आलेल्या ई-मेलला उत्तर देण्यावाचून पर्याय नसतोच मुळी ह्या प्रश्नांची उत्तरे जर ’हो’ असतील तर मग आपल्याला नेटगुनिया झालेला आहे, असे आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण माहितीच्या या महाजालाच्या आधीन झालेलो आहो आणि आपण याचे गुलाम आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण कोणत्याही नवीन तंत्राचे एका बाजूने फ़ायदेच फ़ायदे असतात तर दुसरीकडे मात्र तोटा असतो. कारण आपण त्याच्या जास्त जवळ गेलो तर आपल्याला वाटते आपण जगाच्या फ़ारच जवळ गेलो आहे. आपल्याला खूप माहिती मिळते, परंतु ज्ञान मात्र काहीच नाही. आपण जर हे मानले की आपल्याला नोकरीच्या नवनवीन संधी प्राप्त होतात, खूप काही नवीन शिकायला मिळते परंतु आपण आपल्या घरापासून दुरावतो, आपल्या माणसांशी कमी संवाद साधतो ही साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. मी म्हणत नाही, नेटवर बसू नका. उलट ते फ़ार गरजेचे आहे. परंतु त्याची एक वेळ निश्चित करा जेणेकरून आपण त्याच वेळेत आपले काम करू शकू. जर आपण हे करू शकलो तर मला वाटेल आपण ’नेटगुनिया’ चा नायनाट करू शकतो. कारण तो एक प्रकारचा आजारच आहे. माझ्या मते, ’ब्लॉग’ हे आपल्या माणसांशी संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. परंतु खुप कमी जण ब्लॉग बनवतात (मराठीब्लॉग्ज मध्ये आपल्या हे लक्शात येईलच) व आपले विचार आपल्या माणसांपर्यंत (मला म्हणायचे आहे मराठी माणसापर्यंत) पोहचवतात (माझ्याप्रमाणे). काही जणांना तर ब्लॉग ही काय भानगड (?) आहे असे वाटेल. कारण ते आपला वेळ ई-मेल तसेच आपल्या अकाऊंट मध्येच घालवतात. त्यांना याबाबत फ़ारच कमी माहिती असते. अशा व्यक्तींना ब्लॉग कसा बनवावा याची माहिती देणे हे प्रत्येक ब्लॉगरचे कर्तव्यच आहे (हो?) परंतु ब्लॉग वर पण केव्हा, किती वेळ काम करावे, याची सुध्दा एक वेळ निश्चित करायलाच हवी, असे मला वाटते. नेटगुनिया टाळण्यासाठी काय करायला हवे? तुम्हाला जर असे वाटते की, तुम्ही नेटगुनियाच्या आधीन झालेले आहात तर हा एक गंभीर प्रश्न आहे. ते एक प्रकारचे व्यसनच आहे. यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे आपली इंटरनॆटची एक निश्चित वेळ ठरवा. त्या वेळेत आपण आपली कामे उरकून घ्या. म्हणजेच दररोज पाच - सहा तास वाया घालविण्यापेक्शा जास्तीत जास्त दोन तासच बसा. एक महत्वाची गोष्ट म्हणजे चॅटींग सुध्दा कमीत कमी वेळ करा. काही जणांना सवय असते की ते वेड्यासारखे चॅटींग करत असतात. त्याला काही अर्थ असेल तर ते नक्की करा. पण काही तरी वेळ घालवायचा म्हणून चॅटींग करायची हे मूर्खपणाचे लक्शन आहे. तसेच आपल्या आरोग्यावरसुध्दा परिणाम होऊ देऊ नका. जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर बसण्याने डोळे चुरचुरणे, डोके दुखणे अशा तक्रारी उद्भवू शकतात. यासाठी आपल्या आरोग्याकडे लक्श देणेही जरूरीचे आहे. नेटगुनिया टाळण्यासाठी आपण एखादा ब्लॉग बनवून आपल्या मनाचे विचार, आपल्या भावना जर प्रकट करू शकलो तर खूप चांगले होईल. त्यामुळे आपण अनेक जणांच्या संपर्कात तर राहूच, त्याशिवाय आपली माणसे आपल्या गुणांची कदर कशी करतात, ते सुध्दा अनुभवू शकतात. आपण जर योग्य वेळी, समतोल साधत नेटवर बसलो तर ’नेटगुनिया’ आपल्या चार हात दूर तर राहीलच शिवाय ’इंटरनेट’ हा आपला एक जीवाभावाचा मित्रच होईल नाही का?

7.9.08

उपयुक्त म्हणी

रा‌ईचा पर्वत
बोले तैंसा चाले त्याची वंदावी पा‌ऊले
बुडत्याला काडीचा आधार
बड़ा घर पोकळ वासा
बळी तो कान पिळी

रोज मरे त्याला कोण रडे
बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात
बुडत्याचे पाय खोलात
कोल्ह्यास द्राक्षे आंबट
कोळसा कितीही उगाळला तरी काळाच
क्रियेवण वाचळता व्यर्थ आहे

नेमेचि येतो मग पावसाळा
नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न
नव्याचे नऊ दिवस
कोल्हा काकडीला राजी
गंगेत घोडं न्हालं
गरज सरो अऩ वैद्य मरो
गरजवंताला अक्कल नसते
गरजेल तो पडेल काय?

गाव करी ते राव न करी
गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता
गाढवाला गुळाची चवं काय?

गोगल गाय पोटात पाय
करावे तसे भरावे
तण खा‌ई धन
कामापुरता मामा

6.9.08

जीवन म्हणजे काय असते?

मला नेहमी पडणारा एक प्रश्न आहे. "जीवन म्हणजे काय असते?" जीवन म्हणजे काय हा प्रश्न काही प्रमाणात अनुत्तरीतच राहिला आहे. त्यासाठी मी वाचकांना नम्र आवाहन करून त्यांना "जीवन" हा विषय देऊन लिहायला भाग पाडणार आहे आणि त्यासाठी माझा ई-मेल आहेच - kavitashinde7 (at) gmail (dot) com
काही वाक्ये मी माझ्या अनुभवातून लेखात घातली आहेत आणि काही मला मनापासून वाटतं म्हणून लिहिलं याची कृपया वाचकांनी नॊंद घ्यावी आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की पाठवाव्यात.
माझ्या दृष्टीने "जीवन म्हणजे काय" याचा थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे -
जीवन म्हणजे देवाने मानवासाठी लिहिलेले एक सुंदर गाणे आहे आणि प्रत्येकाने ते आपापल्या पध्द्तीने गायले पाहिजे.

अर्थात ते सुरेल मात्र पाहिजे हं! माणसाच्या बाल्यावस्था, तरूणावस्था व वृध्दावस्था (आणि प्रौढावस्था सुध्दा) या अवस्था असतात. माझ्या दृष्टीने सर्वात चांगली अवस्था म्हणजे बाल्यावस्था होय. कारण याच अवस्थेत व्यक्तीच्या विकासास हातभार मिळत असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर कुंभार ज्याप्रमाणे मडके घडवतो, त्याला जसजसा आकार देतो, तसतसे मडके घडत असते. जीवनाचेही अगदी तसेच आहे. बालपणापासून जे संस्कार मनात रूजत असतात. त्याचेच प्रत्यंतर तरूणावस्थेत होत असते. अर्थात याला व्यक्तीच्या आजुबाजूचा परिसर (ज्याला आपण म्हणतो surrounding) सुध्दा तितकाच कारणीभूत ठरतो. पण म्हणून का देवाने दिलयं जीवन म्हणून जगतच राहाव तर नाही. हे जीवन काहीतरी सत्कारणी लागले तर फ़ार बरे होईल ही सुध्दा जाणीव असायला पाहिजे आणि माझ्या मते, लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? या गोष्टी मला निव्वळ मूर्खपणाच्या वाटतात. (मला कोणावर टिकाटिप्पणी करायची नाही). मला माहित आहे की, समाजव्यवस्था ही मानवानेच निर्माण केलेली आहे आणि नियमही समाजाला मानवतील असेच आहे. कारण आपण कोणतीही गोष्ट करतांना लोकांचा फ़ार विचार करतो. (माझा अनुभव) एखादी गोष्ट लोकांना आवडत नाही, म्हणून ती न करणे हा सर्वात मूर्खपणा आहे. तात्पर्य हेच, मन मारत जगणे काही योग्य नाही. जी गोष्ट तुम्हाला (किंवा तुमच्या कुटुंबाला) करावीशी वाटेल, ती दिलखुलासपणे करा. परंतु ती जर खरच चांगली असेल तर ती कशी चांगली हे पटवून द्यायला मात्र विसरू नका हं! नाही पटली तर काहीच हरकत नाही. एखादी गोष्ट म्हणजे शिक्षण, नोकरी, लग्न इ. संबंधित असू शकते. (ज्याचा त्याचा अनुभव) (भाषण फ़ार लांब होत आहे का?) सुरूवातीला मी ज्या तीन अवस्था सांगितल्या, तुम्ही म्हणाल आपल्या लिखाणाशी याचा संबंध तो काय? पण वाचकहो, त्याचाच तर खरा संबंध आहे. कारण बाल्यावस्था, तरूणावस्था त्यानंतर प्रौढावस्था आणि सर्वात शेवटची (मानली तर) वृध्दावस्था ! ह्या अवस्थेत व्यक्ती सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून चुकते. कुणी नोकरीतून रिटायर्ड होते. म्हणकेच रिकामा, फ़ावला वेळ भरपूर मिळतो. ह्या अवस्थेत आपल्याला नव्या संधी प्राप्त होत असतात. त्या म्हणजे आपले अनुभव, आपल्यावर आलेले प्रसंग, बिकट प्रसंगांना आपण कसे तोंड दिले इ. हे व्रुध्द माणसे तरूणांना किंवा प्रौढांना सांगू शकतात. तसेच माझ्या मते, ब्लागवरून आपले विचार प्रकट करू शकतात. पण हे सर्व करतांना दुसऱ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आपण गदा तर आणित नाही ना! याची सुध्दा काळजी घ्यायला हवी. कारण आपल्या देशात वृध्दाश्रमांची संख्या यामुळे तर वाढत नाहीये ना अशी माझ्या मनात शंका उत्पन्न झाली आहे. वृध्दांनी (आपल्या भाषेत ज्येष्ठ नागरिकांनी) दुसऱ्यांच्या इच्छा आकांक्षा मारणे ही गोष्ट निश्चितच योग्य नाही. तसेच तरूणांनी देखील वृध्दांना अपमानास्पद वागणुक देणे हे आपल्या संस्कृतीचे लक्षण नाही. तर मग करायचे तर काय करायचे? वृध्दांनी आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडल्यावर मुलाच्या संसारात जास्त लक्ष देऊ नये. तो काय करतो किंवा काय करणार आहे हे तो सांगेल तरच ऎकावे. कारण आजच्या तरूणांना आपल्या मर्जीने काही गोष्टी कराव्या असे मनापासून वाटत असते. व्रुध्दांना जर काही सल्ला विचारला, त्यांचा अनुभव विचारला तर मात्र त्यांनी तो नक्की कथन करावा. मुलाला जर काही कामासाठी जर आपल्या व्रुध्द आई वडीलांची गरज पडत असेल तर त्यांनी मदत करावी. हे सर्व करतांना घरातील सूर बिघडणार नाहीत याची काळजी मात्र घ्यावी. खूप दिवसांपासून या विषयावर काहीतरी लिहावे असे मनापासून वाटत होते. आज वेळ मिळाल्यावर माझी इच्छा मी ब्लागच्या माध्यमातून पूर्ण करून घेतली. आपल्याही इच्छा आपण पूर्ण करा आणि हसत खेळत जगा.

5.9.08

भारतीय भित्तीपत्रकांचा जगप्रसिध्द अनमोल ठेवा - ’अजिंठा लेणी’


प्राचीन शैलगृहे व भित्तीचित्रे यांचे एक अप्रतिम जगप्रसिध्द स्थळ म्हणजे ’अजिंठा लेणी’ होय. फ़र्दापूरची लेणि असाही उल्लेख करण्यात येतो. बौध्द लेण्यांसाठी सुप्रसिध्द असे हे स्थान आहे. सह्याद्री पर्वताच्या सातमाळ रांगेतील इंध्याद्री शाखेत ही लेणी खोदलेली आहे. अजिंठा लेणी डोंगरांच्या एका रांगेत असून तिच्या समोर डोंगरांची दुसरी रांग आहे. डोंगराच्या एका कड्यावरून घाटमाथ्यावरचे पाणी खाली दरीत धबधब्याच्या रूपाने कोसळते आणि लेण्याच्या समोरून वाहत जाते. या जलप्रवाहाचीच पुढे वाघुर नदी तयार होते.




३० गुफ़ांची मालिका -
ज्या पहाडात लेणी खोदलेली आहेत, त्याची उंची सुमारे अडीचशे फ़ुटापर्यंत आहे. एकुण ३० बौध्द आहेत. त्यातील ४ चैत्यगृहे असून बाकीचे विहार आहेत. पूर्वी प्रत्येक गुंफ़ा स्वयंपूर्ण होती. प्रत्येक गुंफ़ेतुन खाली झऱ्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या होत्या. आता त्या नष्टप्राय झाल्या आहेत.



चित्रकलेसाठी प्रसिध्द -
अजिंठ्याची लेणी वस्तुकला व मूर्तीकलेसाठी प्रसिध्द असली तरी चित्रकलेसाठी विशेष प्रसिध्द आहे. चित्रे काढण्यासाठी भिंतीवर प्रथम माती, शेण व दगडांची पूड एकत्र करून त्याचा लेप देऊन बनविण्यात आली आहे. छतासाठी भाताचा तूस किंवा ताग यांचा उपयोग केला आहे. त्यावर चुन्याचा हात मारून गेरूने प्रथम चित्रांची बाह्यरेषा रेखाटून त्यात रंग भरण्यात आले. चित्रकारांनी पांढरा, काळा, तांबडा, निळा, हिरवा, पिवळा या रंगांना विशेष प्राधान्य दिले आहे. विशिष्ट जातीची माणसे एका खास रंगानेच रंगविण्यात आली आहे.





स्त्रियांच्या चित्राकृती आकर्षक -
चित्रातील बहुतेक प्रसंग बुध्दांच्या कथांमधून निवडण्यात आले आहे. स्तंभ व छतांवर वेलबुट्टी अप्रतिम काढण्यात आली आहे. महिलांची चित्रे अतिशय सुंदर आहेत. गोरी व सावळी, कुमारीका व प्रौढा, आभूषण धारण केलेल्या स्त्रिया अप्रतिम आहे. विविध देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा यांचीही चित्रे साकारण्यात आली आहेत. पशू - पक्ष्यांचाही त्यात समावेश आहे. काही लेणी अपूर्ण आहेत तर काही खराब झालेल्या आहेत.




इतर वैशिट्ये -
शिल्प व चित्र या द्रुष्टीने ही लेणी विशेष प्रेक्षणीय़ आहे. याशिवाय बुध्दाचा महापरिनिर्वाणाचा प्रसंग गुंफ़ा २६ मध्ये कोरलेला आहे. गौतम बुध्दाच्या मूर्तीची लांबी २३ फ़ूट असूनही मुद्रेवरील भाव सुरेख दिसतात. बुध्दाची मुद्रा शांत असून त्यांच्याजवळ असलेल्या सर्व शोकग्रस्त व्यक्तींच्या मुखावर दु:खाची छाया स्पष्ट दिसते.




प्राण्यांचे चित्रण -
एक नंबरच्या गुंफ़ेतील बैलांची झुंज प्रेक्षणीय़ आहे. याच गुंफ़ेत चार हरणांचे एक खास शिल्प आहे. एका चौकटीत २ उभी व २ बसलेली अशी चार हरणे आहे. पण या सगळ्यांना मिळून एकच तोंड आहे.
लेण्यातील बरीचशी चित्रकला आज अंधुक व अस्पष्ट होत आहे. या भित्तीचित्रांचे जतन करणे ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे.



4.9.08

जीवन जगणे म्हणजे.............

* जीवन म्हणजे नवे व जुने यांचा संघर्ष

* जीवन म्हणजे म्रुत्युशी चाललेला लपंडाव

* जीवन म्हणजे बऱ्या- वाईट स्म्रुतीचे गाठोडे

* जीवन म्हणजे सुख दुखाच्या मिश्रणाचे नाटक

* जीवन म्हणजे बुध्दी, शील, चारित्र्य यांचे संवर्धन

* जीवन म्हणजे बुध्दी, भावना आणि शरीर यांचा त्रिवेणी संगम

* जीवन म्हणजे आरंभाकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवाह

* जीवन म्हणजे सुख-दुखाच्या चौकड्या आणि जन्म म्रुत्युच्या सीमा असणारा सारीपाट

* जीवन म्हणजे एक शाळा आहे. ज्यात आपण काहीतरी नवीन शिकत असतो.

* जीवन हे क्षणाक्षणाने बनते. क्षण जाता जीवन जाते.

3.9.08

आधुनिक म्हणी

आपल्या सर्वांच्या आवडीच्या विषयात (म्हणजेच मराठीत) जर का "म्हणीं" चा समावेश नसला तर काय होईल हे आपल्याला माहितच आहे. पण जर खालील प्रकारच्या "आधुनिक म्हणी" आल्या तर काय बहार येईल याची कल्पनाच न केलेली बरी ! कारण या म्हणी थोड्य़ाफ़ार फ़रकाने सर्वांच्या जीवनात येत असतात.

१. आधीच MTNL आणि त्यात पावसाळा

२. आपला तो स्वातंत्र्यसैनिक आणि दुसऱ्याचा तो दहशतवादी

३. सरकारी काम आणि दहा वर्ष थांब

४. ’काय द्या’ नी बोला

५. भक्त जातो देवापाशी, लक्ष त्याचे चपलांपाशी

६. घरोघरी फ़ैशनेबल पोरी

७. मरावे परि व्हिडिऒकैसेटरूपी उरावे

८. रिकामा मंत्री उदघाटन करी

९. गरज सरो अन मतदार मरो

१०. कशात काय अन खड्ड्यात पाय

११. इन्कम थोडे अन पोरे फ़ार

१२. उचलली लिपस्टिक अन लावली ऒठांना

१३. तुका म्हणे भोग सरे, पास होता रद्दड पोरे

१४. कॉल आला होता पण नोकरी लागली नाही

१५. चार तास अटकेचे अन चार तास सुटकेचे

१६. पाहुणा गेला अन चहा केला

१७. म्हशी मेल्या अन चारा संपला अन हाती घोटाळा आला

१८. बसेन तर खुर्चीवर

१९. मंत्र्याचे बिऱ्हाड दौऱ्यावर

२०. आपलेच गोलंदाज आणि आपलेच फ़लंदाज

२१. गाढवापुढे वाचली गीता अन वाचणाराच गाढव होता.

2.9.08

मराठी माणसा, जागा हो.........

आपण व्यावसायिक आहात की नोकरदार? नोकरदार असाल तर आहे त्याच नोकरीत समाधान मानता की अजून यशाच्या दोन पायऱ्या पुढे सरकायला तयार आहात? आपण म्हणाल हे विचारण्याचे कारण? तर कारण असे की, नोकरी करत असाल तर ज्या कंपनीमध्ये नोकरी करता तशी कंपनी आपल्यालासुध्दा उभी करता आली तर ? किंवा ज्या खुर्चीवर बसून बॉस तुम्हाला दोन - चार शब्द बोलतो (सर्वच बॉस नसतात हो असे) किंवा तुम्हाला बॉसची हांजी - हांजी करावी लागते त्या बॉसच्या जागी आपल्यालासुध्दा बसता आले तर ? हे असे विचार जर आपल्या मनात असतील तर आपल्या या विचारांना, कल्पनांना सत्य आणि वास्तव रूप देण्याचीसुध्दा आपल्यात ताकद आहे का याचा विचार करा. आपण म्हणाल, नोकरी चांगली आहे, पाच आकडी पगार आहे, कंपनीकडून बंगला, गाडी, मोबाईल सर्व सुखसोई आहेत मग हे असले विचार येतीलच कशाला ? पण थांबा, ह्या सुखसोई असल्यावरसुध्दा वेगळा विचार करणारे आपल्यातीलच खूपजण सापडतील. कारण काय, तर त्यांच्याजवळ कला आहे, कौशल्य आहे. त्यांना आपल्या मनातील कल्पनांना वास्तवाची जोड द्यायची आहे. परंतु त्यांच्या आड येत आहे ती नोकरी. मग ही नोकरी सोडून दिली तर आपल्यातील कौशल्याला भरारी मारता येईल का? की नंतर नोकरी सोडल्याचा पश्चाताप करावा लागेल हे सुध्दा विचार मनाला शिवल्याशिवाय राहणार नाहीत. हे विचार नक्कीच एका मराठी माणसाचेच असतात (काही अपवाद वगळता). वरील चर्चा करण्याचे एकच कारण, जास्तीत जास्त मराठी लोकांनी व्यवसाय पत्करावा. व्यवसाय पत्करण्याचे एक कारण असे की, व्यवसायात मराठी माणुस कमीत कमी उतरतो. दुसरे असे की, त्याला एकदाचे स्थैर्य हवे असते आणि ते फ़क्त नोकरीतच असे त्याला वाटत असते. मला असे म्हणायचे नाही की, नोकरी मूळीच करू नका.परंतु नोकरी करून जर तुम्हाला आपल्या अंगभूत गुणांना वाव द्यायची संधी मिळाली तर ती मूळीच सोडू नका. व्यवसाय करायचा म्हटला तर प्रत्येक माणसाचा पहिला प्रश्न तो म्हणजे भांडवल. कारण कोणताही व्यवसाय करायचा म्हटला की तोच प्रश्न भेडसावतो. माझ्या मते, प्रत्येक युवकाने जर संघटीत झाले तर हा प्रश्न सोडवायला काही प्रमाणात तरी मदतच होईल. व्यवसाय कोणता करावा तर जो आपल्याला पसंत पडतो तो करा किंवा आपली शैक्शणिक पातळी पाहून सुध्दा व्यवसाय ठरवला जाऊ शकतो. तसेच महत्वाचे म्हणजे आपली आवड जपून जो व्यवसाय करावासा वाटेल तोसुध्दा करता येतो. व्यवसायात सुरूवात एखाद्या लघुउद्योगापासून केली तरी चालेल. कारण कोणतेही काम मनापासुन केले तर त्या आपण लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे महाकाय वृक्षात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही आणि यासाठी आपल्याकडे पाहिजे तर जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास. मग तो व्यवसाय कुठलाही असो, त्यात लाज वाटू न देता काम केले पाहिजे. कारण माझ्या अनुभवानुसार, मराठी माणसाचा एकच प्रश्न असतो. हे काम केले की लोक काय म्हणतील, आपल्या आई-वडीलांनी कधीच व्यवसाय केला नाही. मग मी का करू ? मराठी माणसाची परिस्थिती पहिल्यापेक्षा सुधारत चालली आहे. त्याला सुध्दा समजायला लागलेले आहे की काय करावे किंवा काय करू नये. परंतु ही परिस्थिती दुप्पट वेगाने बदलायला हवी, असे मनापासून वाटते. मी नेहमी बघते, इकडच्या मुलांचा नोकरीचा एकच हमरस्ता (शॉर्टकट) असतो. जास्तीत जास्त मुले I.T.I. करतात व पुण्या-मुंबईला कुठल्यातरी नोकरीला चिपकले म्हणजे आपले काम झाले असे त्यांना वाटते आणि विशेष म्हणजे कमी पगारावर काम करतात. परंतु ही मराठी मुलांची फ़ार वाईट परिस्थिती आहे. त्या कामातही मेहनत आहे, काम आहे. पण म्हणून का जीवनभर फ़क्त एका कंपनीतच कर्मचारी (लेबर) म्हणून काम करावे. मराठी मुलाने झेप घेणे फ़ार गरजेचे आहे. मग मी तर म्हणेन शेतीही केली तरी चालेल. कारण आपण शेती हाही एक व्यवसाय म्हणून पत्करू शकतो आणि शेतीत जास्तीत जास्त तरूणांनी सहभाग घेणे ही तर काळाची गरज आहे. आणि त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे जागे व्हा, संघटीत व्हा व व्यवसाय करा. आपल्याला माझे म्हणणे कसे वाटले ते सांगा व प्रतिक्रियासुध्दा अवश्य कळवा.

1.9.08

प्रथम तुला वंदितो





प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया


विघ्न विनाशक, गुणिजन पालक,


दुरीत तिमीर हारका


सुखकारक तूं, दु:ख विदारक,


तूच तुझ्या सारखा


वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभू राया


सिद्धी विनायक, तूच अनंता,


शिवात्मजा मंगलासिंदूर वदना, विद्याधीशा,


गणाधीपा वत्सला


तूच ईश्वरा सहाय्य करावे, हा भव सिंधू तराया


गजवदना तव रूप मनोहर, शुक्रांबर शिवसुता


चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता


रिध्दी सिध्दीच्या वरा, दयाळा, देई कृपेची छाया